नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर उद्या (बुधवार) दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक होईल. त्यामुळे मोठ्या प्रतीक्षेनंतर दिल्लीला नवा महापौर मिळेल.
दिल्ली पालिकेची निवडणूक होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. त्या निवडणुकीत बाजी मारत आपने बहुमताचा आकडा गाठला. त्यामुळे भाजपची दिल्ली पालिकेतील 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली.
महापौर निवडीसाठी आतापर्यंत तीन वेळा दिल्ली पालिका सभागृहाच्या बैठका बोलावण्यात आल्या. पण, तिन्ही वेळा गदारोळामुळे महापौर निवड झाली नाही. त्या गदारोळाचा ठपका आप आणि भाजपने एकमेकांवर ठेवला.
अखेर महापौर निवडीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले. न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशामुळे महापौरपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.