मुंबई : महाविकास आघाडीच्या काळात आणि करोना काळात गरजूंचा मोठा आधार असणारी शिवभोजन थाळी आता बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण शिवभोजन थाळी योजनेत मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला असल्यामुळे ही योजना बंद होण्याची शक्यता आहे.
शिवभोजन थाळी योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे. या योजनेतंर्गत राज्यातील जनतेला 10 रुपयांत जेवण मिळत होते. करोना काळात याची किंमत 5 रुपये करण्यात आली होती. या योजनेमुळे गरिबांना मोठा आधार मिळत होता. मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती.
राज्यात सध्या एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून विविध मदत दिली जाते.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने कारभार हाती घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा शिंदे सरकारला संशय आहे. आता या योजनेचा आढावा घेतल्यानंतर ही योजना चालू करायची की बंद करायची याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.