चंद्रपूर – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. याशिवाय राहुल गांधींनी लंडनमधील भाषणादरम्यान सावरकरांवर खोटे आरोप केले होते. याप्रकरणी सावरकरांच्या नातवाने महाराष्ट्र न्यायालयात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली.
हे प्रकरण ताजे असतानाच चंद्रपूरमध्ये एका सभेत प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी सावकरांबाबत मोठे विधान केले. या प्रकरणावरून वाद निर्माण झाल्यानंतर शिवानी वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, “संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मी माझे विचार मांडू शकते. मी सावकरांबाबत जे बोलले ते चुकीचं असल्याचे मला वाटत नाही. प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात, मी माझे विचार मांडले. काँग्रेस पक्ष नेहमीच सत्याच्या बाजुने उभा राहिला आहे. माझ्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा मिळणं, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट असून मला एक ऊर्जा मिळते.”
नेमकं काय म्हणाल्या होत्या शिवानी वडेट्टीवार ?
‘बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. हे शस्त्र राजकीय विरोधात वापरायला हवे, असे सावरकरांचे विचार होते. ते तुम्ही तुमच्या विरोधकांच्या विरोधात वापरलं पाहिजे. या विचारांशी प्रामाणिक असलेल्या लोकांपासून माझ्यासारख्या आणि येथे असलेल्या महिलांनी सुरक्षित कसे समजावे? असा प्रश्न सु्द्धा त्यांनी उपस्थित केला आहे.’ तसेच अशा लोकांच्या प्रचारासाठी हे लोक मोर्चा काढतात, असे म्हणत भाजप-शिंदे सरकारवर निशाणा साधला होता.