चहरच्या कामगिरीला शिवमचा पाया

नागपूर: नवोदित मध्यमगती गोलंदाज दीपक चहरने रविवारी बांगादेशविरुद्धच्या निर्णायक सामन्यात भारतीय संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. त्याने हॅट्ट्रिकसह 6 बळी घेतले, मात्र त्यासाठी दुसरा मध्यमगती गोलंदाज शिवम दुबे याने पाया घातला होता.

चहरने 7 धावा देत 6 बळी घेतले. भारतीय संघाने या कामगिरीच्या जोरावर तीन टी-20 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. या सामन्यात चहरबरोबरच शिवम दुबे यानेही महत्त्वाची भूमिका बजावली. फॉर्मात असलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांना शिवमने बाद केले व चहरसाठी अनुकुल वातावरण निर्माण केले. बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुश्‍फिकुर रहिमला 14 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बाद केले.

16 व्या षटकात आक्रमक फलंदाजी करत असलेला महंमद नईमला बाद केले व तिथेच सामन्याला कलाटणी मिळाली. नईमला बाद केल्यानंतर शिवमने पुढच्याच चेंडूवर अफिफ हुसेनलाही बाद केले व सामना भारताच्या बाजुने झुकला. त्याची हॅट्ट्रिकची संधी हुकली तीन चेंडूतच शिवमने त्याची जबाबदारी उत्तम पार पाडली.

धोनीमुळे चहरचे यश

दीपक चहरच्या यशामागे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. हे खुद्द चहरनेच सांगतिले. चहर धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग संघाकडून आयपीएल स्पर्धेत खेळतो. एका सामन्यात अखेरच्या षटकांमध्ये त्याने खुपच सुमार गोलंदाजी केली होती, यामुळे कधीही भर मैदानावर न चिडणारा धोनी चिडला आणि त्याने चहरला तिथेच सुनावले. चहरला हे अनपेक्षित होते. तेव्हा चहर रडला देखील होता, मात्र त्यानंतर त्याने जबाबदारी ओळखुन खेळ केला. त्याने आयपीएलबरोबर देशांतर्गत स्पर्धेतही सर कामगिरी केली व अखेर त्याने संघात स्थान मिळविले. धोनीच्या त्या रागावण्यामुळेच आपल्याला सरस कामगिरीची जाणीव झाली व आज जे यश मिळाले ते त्यामुळेच, असेही चहरने व्यक्त केले.

सचिनकडून चहरचे कौतुक

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दीपक चहरचे कौतुक केले आहे. दीपकची गोलंदाजी अप्रतिम होती. त्याने खूप चतुराईने आणि दडपण न घेता मोक्‍याच्या क्षणी बांगलादेशचे गडी बाद केले. शिवम दुबे, श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनीही निर्णायक सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे सांगत सचिनने संघाचेही अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.