पुणे – शिवाजीराव भोसले बॅंक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॅंकेचे संचालक अनिल शिवाजीराव भोसले यांच्यासह चौघांना अटक केली.
याप्रकरणी अनिल भोसले, संचालक सूर्याजी पांडुरंग पिसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दत्तू पडवळ, मुख्य लेखापाल शैलेश संपतराव भोसले यांना अटक करण्यात आली.
गैरव्यवहारप्रकरणी शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेची ईडीकडून चौकशी करण्यात येत होती. ईडीच्या पथकाने 15 जानेवारी रोजी शिवाजीनगर येथील वाकडेवाडी परिसरात असलेल्या बॅंकेच्या मुख्य कार्यालयावर छापा टाकला होता.
ईडीकडून या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 71 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या पथकाकडून छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे तसेच डिजिटल पुरावे जप्त करण्यात आली आहेत. पुणे पोलिसांनी भोसले यांच्या महागड्या मोटारी जप्त केल्या होत्या.