नवी दिल्ली – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला. राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली. तसेच त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुख्य शिवसेना म्हणून मान्यता दिली.
या निकालाच्या विरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. याच प्रकरणी उद्या, सोमवारी सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे याचिकेवर सुनावणी होणार आहे. हे प्रकरण शिवसेना आमदार अपात्रताशी संबंधित आहे. त्यामुळे या सुनावणीला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.
येत्या 22 जानेवारीला (सोमवारी) अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर केंद्र सरकारकडून अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सोमवारी कोर्टाने सुट्टी जाहीर केली नसल्याने सुनावणी होणार आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण 20 नंबरवर आहे, अशी माहिती समोर आली आहे.
सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवले होते. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा त्यांच्या नेतृत्वातील सरकार कोर्टाच्या आदेशाने मिळू शकले असते, असेही कोर्टाने म्हटले होते. पण विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती वैध ठरवली आहे. त्यामुळे त्यांच्या बाजूने कोर्टात काय युक्तिवाद केला जातो आणि सुप्रीम कोर्ट त्यावर काय निरीक्षण नोंदवते याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.