नाशिक – केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने खासगी क्लासेससंदर्भात जारी केलेल्या अध्यादेशातील काही तरतुदींविराेधात खासगी क्लासचालकांनी एल्गार पुकारला आहे. या तरतुदींविराेधात आंदोलन व न्यायालयीन लढा देण्याचा इशाराही क्लासचालकांनी घेतला आहे.
क्लासचालकांची पुढच्या आठवड्यात शहरात राज्यस्तरीय बैठक हाेत असून यात आगामी धोरण निश्चित केले जाईल, अशी माहिती कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुळे म्हणाले, शासनाकडे क्लासचालकांची कुठलीही नोंद करून घेतली जात नाही. मग प्रस्तावित अध्यादेशात नोंदणी रद्द करण्याचा मुद्दा गोंधळ निर्माण करणारा आहे. वयोमर्यादेसंदर्भात अटीमुळेही क्लास चालकांमध्ये गोंधळ उडाला आहे.
क्लासचालकांच्या मागण्या…
– केंद्र किंवा राज्य शासनाने क्लासेससाठी नियमावली करावी.
– सक्षम अधिकारी नेमताना क्लासेसची नोंदणी करावी.
– छोटे, मध्यम क्लासेस संचालकांचा विचार करावा.
– १६ वर्षांआतील विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचा मुद्दा स्पष्ट व्हावा.
– आसन व्यवस्थेबाबत नियम अवास्तव असल्याचा दावा.
– विद्यार्थी संख्या, शुल्क आकारणीचा उल्लेख नाही.