- मुख्यमंत्र्यांविरोधातील वक्तव्याचा निषेध
- भाजपा कार्यालयासमोर निदर्शने
पिंपरी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्याशिवाय, काही काळ शिवसैनिकांनी रास्ता रोको करीत पुणे-मुंबई महामार्ग अडवला होता. पिंपरीतील भाजप कार्यालयासमोरही निदर्शने करण्यात आली. आज दिवसभर शिवसेनेच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी राणे यांच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याचा पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दुपारी तीनच्या सुमारास शिवसैनिक जमले होते. त्यांनी राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. तसेच, येथील पुणे-मुंबई महामार्गावर पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ रोखून धरली होती. तसेच, भाजपच्या पिंपरी येथील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सुमारे अडीच हे तास आंदोलन चालले.
आंदोलनामध्ये शिवसेना शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबूकस्वार, महिला संघटिका ऊर्मिला काळभोर, वैशाली मराठे, अनिता तुतारे, महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, इरफान शेख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्यांनी जपून शब्द वापरावे – भोसले
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यांनी जपुन शब्द वापरावे. आज आम्ही त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून निषेध नोंदवला आहे. त्यांचे आक्षेपार्ह वक्तव्य लक्षात घेता भाजपाची एकही यात्रा शहरात होऊ देणार नाही. नारायण राणे यांच्या नेतृत्वामुळे भाजपचे नुकसानच होणार आहे.