मुंबई – टॉप्स ग्रुप (सिक्युरिटी) कंपनीचे प्रमुख राहुल नंदा यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांबाबत प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरु असताना अभिनेत्री कंगना रणावतने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
प्रताप सरनाईक यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा आरोप कंगनाने केला आहे. याविरोधात प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली असून हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे.
याबाबत आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरनाईक म्हणाले, अभिनेत्री कंगना रणावतने एक ट्विट केले होते. यामध्ये मुंबईत आल्यानंतर तोंड फोडण्याची गोष्ट करणाऱ्यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले आहे, असा तिने उल्लेख केला आहे. तिच्या ट्विटच्या आधारे अनेकांनी बातम्या केल्या.
ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने घरी काय सापडले याची माहिती दिलेली नाही. कंगनाकडून अशा पद्धतीने बदनामी करणे चुकीचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यामुळे कंगना रणावत आणि खोटे वृत्त प्रसारीत करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्याविरोधात मी हक्कभंग दाखल केला आहे. कंगनाच्या ट्विटच्या आधारे ज्या मीडियाने खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या त्यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव मान्य करावा अशी विनंती मी अध्यक्षांना केली आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.