नवी दिल्ली – चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे सुमारे 20 लाख सदस्यांनी जगातील सर्वात मोठ्या कंपन्या, बॅंका, माध्यम समूह, विद्यापीठे आणि सरकारी यंत्रणात शिरकाव केल्याची स्फोटक माहिती उघड झाली आहे.
“दि ऑस्ट्रेलियन’ या दैनिकाच्या हाती ही माहिती लागली असून त्यात या 20 लाख लोकांची नावे त्यांचे पक्षातील स्थान, जन्मतारीख, त्यांचा राष्ट्रीयत्व क्रमांक आणि वंश यांची माहिती असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला.
बोईंग, वोक्सवॅगन यांसारख्या मोठ्या कंपन्या, पीफायझर आणि ऑस्ट्राझेन्का सारख्या औषध कंपन्या आणि एएनझेड आणि एचएसबीसी सारख्या मोठ्या बॅंकामध्ये हे हस्तक पेरले आहेत. एचएसबीसी आणि स्टॅंडर्ड चार्टर बॅंकेत तब्बल 600 कर्मचारी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत.
अशा स्वरूपाची माहिती उजेडात येण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे, असे ऑस्ट्रेलियन पत्रकार आणि स्काय न्यूजचे प्रवक्ते शारी मार्कसन यांनी सांगितले. ही माहिती काही चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य कोण आहेत यांची नाही. तर ऑस्ट्रेलिया ते अमेरिका, अगदी इंग्लंडपर्यंत ते पसरलेले आहेत. शी जीनपींग यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष आणि त्यांचा देश कसे काम करतो, त्याचा हा पुरावा आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
पाश्चिमात्य कंपन्यांमध्ये तब्बल 79 हजार कर्मचाऱ्यांच्या रुपाने चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या शाखाच उघडल्या आहेत. त्यांना फोन केला तर ते कम्युनिस्ट पक्ष किंवा थेट जीनपगि यांच्या संपर्कात येऊ शकतात, असे या बातमीत म्हटले आहे. आर्थिक हेरगिरीसह आपली बौध्दीक संपदा चोरीपासून रोखण्यासाठी यातील काही जागतिक कंपन्यांमध्ये कोणतीही यंत्रणा नाही,असेही मार्कसन यांनी म्हटले.
या दैनिकांनी काम करत असलेल्या कम्युनिस्ट सदस्यांची नावे छापली नाहीत.मात्र ते काम करत असलेल्या कंपन्यांची नावर उघड केली आहेत.
हा डाटा शांघायमधील सर्व्हरमधून एका बंडखोराने 2016मध्ये मिळवला आहे. तो त्याला प्रतीहेरगिरीसाठी वापरायचा होता. त्यानंतर ही माहिती चीनसाठीच्या आंतर संसदीय गटातील द्विपक्षीय गटाच्या हाती लागली. त्यानंतर ती दि ऑस्ट्रेलियन आणि इंग्लंडमधील मेल या दैनिकांमध्ये रविवारी छापून आली, असा प्रवास बेल्जीयमच्या डी स्टॅंडर्ड या दैनिकाने कथन केला आहे.