मुंबई – शिवसेनेच्या 16 आमदारांच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधीमंडळात आज सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटानं युक्तिवाद केला. याचिका एकत्र करण्यावरुन आणि पुरावे सादर करण्यावरुन दोन गटांमध्ये मतभेद होते. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) आजचा निकाल राखून ठेवला असून पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे.
शिंदे गटाकडून (Shinde Group) वकील अनिल साखरे यांनी बाजू मांडली. तर ठाकरे गटाकडून (Thackeray Group) वकील देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. ठाकरे गटाच्या वतीने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या अशी मागणी करण्यात आली. तर या सर्वांना स्वतंत्र पुरावा द्यायचा असल्याने त्याची वेगवेगळी सुनावणी घ्यावी अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
दोन्ही गटाचा युक्तीवाद –
आमदारांच्या अपात्रतेसंबंधित ज्या काही 40 याचिका आल्या आहेत त्या सर्व याचिका एकत्र करा अशी आमची मागणी आहे ते का केले जाते नाही. यातील याचिकांचा विषय एकच असल्याने एकत्रित याचिकावर सुनावणी घेतल्यास या सगळ्या प्रकरणाबाबत निर्णय घेण्यास वेळ कमी लागेल आणि तातडीने निर्णय देणे शक्य होऊ शकेल. मात्र याला शिंदे गटाच्या वकिलांनी विरोध केला. शिंदे गटाचे वकील अनिल साखरे म्हणाले, सर्व याचिका एकत्र नको, त्यांची वेगवेगळी सुनावणी घ्या. आम्हाला स्वतंत्र पुरावे द्यायचे आहेत. यामुळे आमदारांची स्वतंत्र सुनावणी व्हावी असे आमचे म्हणणे आहे.
यावर्षी निकाल लागणं कठिण –
संभाव्य वेळापत्रकात कागदपत्रं तपासणी, साक्ष नोंदवणे आणि उलट तपासणीचा समावेश. या प्रकियेला किमान तीन महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन असल्याने सुनावणीची शक्यता कमी आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल यावर्षी लागण्याची शक्यता कमी आहे. आमदार अपात्रता प्रकरणी निकाल यावर्षी लागणं कठीण असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांची नावे –
१. एकनाथ शिंदे
२ .अब्दुल सत्तार
३. संदीपान भुमरे
४. संजय शिरसाट
५. तानाजी सावंत
६. यामिनी जाधव
७. चिमणराव पाटील
८.भरत गोगावले
९.लता सोनवणे
१०. प्रकाश सुर्वे
११. बालाजी किणीकर
१२. अनिल बाबर
१३. महेश शिंदे
१४. संजय रायमूलकर
१५. रमेश बोरणारे
१६. बालाजी कल्याणकर