वाई येथे पंताजी काका बोकिल पुरस्काराने गौरव
भोर – शिवतीर्थ श्रीक्षेत्र वाई येथे महाराष्ट्रतील ज्येष्ठ मान्यवर व शिवप्रताप समिती यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रताप अर्थात अफजलखान वधाच्या आनंदोत्सव दिनी देण्यात येणारा आदर्श निस्पृह विधिज्ञ पंताजी काका बोकील अभिवक्ता पुरस्कार भोरचे, कायदेशीर नितिमूल्ये जपणारे ज्येष्ठ वकील ऍड. विजय मुकादम यांना सन्मानपूर्वक देऊन गौरवण्यात आले.
पुणे, सातारा जिल्ह्यात प्रभावी व कार्यक्षम आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत वकिली करणारे ऍड. विजय मुकादम हे पक्षकाराला न्याय मिळवून देण्याचा स्वभाव व माणुसकीचे दर्शन घडविणारा रोखठोक स्वभाव, अन्यायासविरुद्ध जोरदार प्रहार करण्याचा बाणा, आपल्या आशिलाची सुयोग्य बाजू स्पष्टपणे मांडून न्यायदानासाठी अविरत कार्य करीत आहेत.
याचीच दखल शिवप्रताप समिती वाई यांनी घेऊन त्यांना पंताजी काका बोकील पुरस्काराने सन्मानित केले आहे. या प्रसंगी गो-शाळेचे संस्थापक पंडित दादा मोडक, वाईच्या नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे, भोरचे संघचालक विनायक सणस, विश्व हिंदू परिषदेचे बाबुजी नाटेकर उपस्थित होते. वाई, प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने विजया भोसले, सुहास पानसे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
वकील हा व्यवसाय नसतो तर ते समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. हे मी कृतीतून दाखवून अन्यायग्रस्त नागरिकांच्या अंधकारमय जीवनात न्यायाची ज्योत पेटवून त्यांचे जीवन सुकर करीत आहे, चांगले काम केल्यास समाज निश्चितच त्याची दखल घेतो.
– ऍड. विजय मुकादम, भोर