आठवड्यातील पाचवी घटना; महामार्गावर सुरुरच्या हद्दीत सुरू आहे अपघातांची मालिका
कवठे – सलग तिसरा दिवस, तेच ठिकाणी आणि तीन वाहनांच्या अपघाताची घटना मंगळवारी घडली. सातारा- पुणे महामार्गावर सुरुर (ता. वाई) गावच्या हद्दीत दुभाजकानजीक महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून खड्डा पडला आहे. या खड्ड्यात वाहने आदळून वाहनांचे टायर फुटून अपघाताच्या घडना घडत आहे.
विशेष म्हणजे रविवारी आणि सोमवारी याच ठिकाणी चारचाकी वाहने आदळून टायर फुटल्याने अपघाताच्या घटना ताज्या असतानच मंगळवारी पुन्हा त्याच ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी आणि विशेष म्हणजे तीन वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातात संबंधित वाहनांमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, या आठवड्यातील हा पाचवा अपघात आहे.
सुरुर येथील शिवाजी विद्यालयासमोर महामार्गावर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हा रस्ता इतका खराब झाला आहे की वेगात आलेली वाहने या खड्ड्यांच्या जवळ आल्यावर अचानक वेग कमी करतात. परिणामी वाहने एकमेकांवर आदळतात किंवा भरधाव वेगात जायचा प्रयत्न केल्यास खड्ड्यात आदळून टायर फुटून वाहने अनियंत्रित होवून अपघात घडत आहेत. रविवारी 15 रोजी एक दुचाकीचालकाचा या ठिकाणी अपघात झाला होता. त्यानंतर सोमवारी 16 रोजी भरधाव वेगातील एक कार या ठिकाणी टायर फुटल्याने उभी होती.
त्यांना टायर बदलताना मदत करीत असलेल्या स्थानिक तिघांच्या दुचाकीला पोलीस गाडीचा टायर फुटल्याने धडक बसली होती. या घटना ताज्या असतानाचा आज मंगळवारी एक चारचाकी भरधाव वेगात जाताना खड्डे बघून चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारचालकाने ब्रेक दाबला, मात्र त्या स्विफ्टच्या मागून आलेल्या दुसऱ्या स्वीफ्ट चालकाला कार अनियंत्रत झाल्याने तो पुढील स्वीफ्टवर जाऊन आदळला.
पुन्हा पाठीमागून आलेली इर्टिगा कारही स्वीफ्टवर आदळली. अशा प्रकारे या तीन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात कारमधील प्रवासी जखमी झाली आहेत. दरम्यान, सुरुवातीला थांबलेली कार मात्र निघून गेल्यामुळे ती या अपघातापासून बचावली. अपघातामध्ये इर्टिगाचे चालक विद्यानंद सोनमळे (रा. सैदापूर, ता. सातारा), दुसऱ्या कारचे चालक यश संदीप शेटे (रा. कात्रज, पुणे) व तिसऱ्या कारचे चालक पांडुरंग विठ्ठल शिंदे (रा. खडकवासला, पुणे) यांना किरकोळ जखमा झाल्या. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.