संगमनेर, (प्रतिनिधी) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यासह नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ, उपमुख्याधिकारी संजय पेखळे, करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ, बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यासह मान्यवर उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले . संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने रामकृष्ण सभागृहात उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या तैलचित्राचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत नगरपालिकेचे जमादार संजय देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले.
शिवरायांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आल. या मिरवणुकीत शिवराय आणि जिजाऊ यांच्या वेशभूषा केलेले नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. एमपीएससी व यूपीएससी या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नगरपरिषदेच्या प्रांगणातून ढोलताशांच्या गजरात निघालेली शिवरायांची मिरवणूक शहरातील बाजारपेठ तेलीखुंट, सय्यदबाबा चौक, मेन रोड ,अशोक चौक या मार्गाने निघून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. सर्वांना भगवे फेटे परिधान करण्यात आले होते, त्यामुळे सर्वत्र भगवे वातावरण निर्माण झाले होते.