वडगाव मावळ,{ किशोर ढोरे }– येत्या वर्षभरात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होण्याची शक्यता आहे. निवडणूक तोंडावर आल्याने दीड-दोन वर्षांपासून अडगळीत पडलेल्या मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांना चांगलाच भाव आला आहे. नेते व विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत आहेत. नेते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवारही विचारत नसल्याने कार्यकर्ते जवळपास गायब झाले होते. आता आगामी निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांनी सुगीचे दिवस येणार आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून, मावळ मतदारसंघात इच्छुक उमेदवार आणि नेते मंडळी कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यातूनच सर्वच पक्षांकडून ‘गाव चलो, घर चलो, अशी अभियान घेण्यास सुरूवात झाली आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी इच्छुक लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी कामाला येणार आहेत. आता सुख-दुःखाच्या प्रसंगात नेतेमंडळी आवर्जून हजेरी लावत आहेत. इच्छुक उमेदवार प्रकाशझोतात राहण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधत आहेत.
सर्वच कार्यक्रमांना हजेरी
साखरपुडा आणि लग्न सोहळ्यास नेतेमंडळींची गर्दी वाढली आहे. लग्नाचा मुहूर्त साधताना पुढाऱ्यांची दमछाक होत आहे. लग्नाचा मुहूर्त चुकला, तरी लग्न सोहळ्यास हजेरी लावण्याकडे कल वाढला आहे. दशक्रिया विधीसाठी गर्दी वाढली आहे. एरवी कोणाचे निधन झाले, याकडे लक्ष न देणारे नेते सांत्वन करण्यासाठी सर्वसामान्यांच्या घराचा उंबरा चढत आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी विविध उपक्रम राबविण्यावर भर देत आहेत.
महायुतीमध्ये मावळ लोकसभा मतदार संघावर आपलाच दावा असल्याचे शिवसेना (शिंदे गट) सांगत असला तरी मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचेच राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपही या मतदार संघावर आपला दावा सांगत आहेत. यासाठी दावे, प्रतिदावे केले जात आहेत.
सद्यःस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्या, तरी लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील दोन्ही बाजूचे नेते सक्रिय झाले आहेत.
उमेदवारीसाठी रस्सीखेच
मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या श्रीरंग बारणे करीत आहेत. भाजपकडून बाळा भेगडे यांचे नावे चर्चेत आहे. राष्ट्रवादीने या मतदार संघावर दावा सांगितला असला तरी उमेदवारीसाठी कोणाचे नाव चर्चेत नाही. मात्र ऐनवेळी पार्थ पवार हे मैदानात येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकसभेची निवडणुक लिटमस टेस्ट
लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीची पायाभरणी होणार आहे. यामुळे मावळ लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा मतदार संघात सर्वच पक्षांची लिटमस टेस्ट असणार आहे. महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते, पदाधिकारी एकत्रित विविध कार्यक्रमांना हजेरी लावून वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. यामुळे मावळ तालुक्यातील राजकारण तापत आहे. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत महायुतीतील सर्वच पक्ष एकत्र आल्याचे दिसून आले आहे.