भोसरी – राजमाता जिजाऊ महाविद्यालयाची कुस्ती क्रीडा प्रकारातील माजी खेळाडू सोनाली महादेव तोडकर हिला राज्य सरकारने शिव छत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले. ही बाब महाविद्यालयाला भूषणावह असल्याने, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने माजी आमदार विलास लांडे यांनी सोनाली तोडकरचे अभिनंदन करत, सत्कार केला.
राज्य सरकारच्या वतीने राज्यातील खेळाडूंचा बालेवाडीतील क्रीडा संकुलात क्रीडा क्षेत्रामधील सर्वोच्च असलेला शिव छत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सोनाली तोडकर हिने ने राष्ट्रकुल 2016 साली कुस्ती स्पर्धेत रजत पदक प्राप्त केले आहे. त्याच बरोबर 2018 साली अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धत तिने कास्यपदक पटकावले आहे. सध्या ती पटियाला येथे एनआयएस या पदवीचे शिक्षण घेत आहे.
कुस्ती क्षेत्रातील तिच्या योगदानाची दखल घेत, राज्य सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या वतीने तिला शिव छत्रपती पुरस्काराने (सन 2019-20 ) गौरविण्यात आले. असे विद्यार्थी महाविद्यायाबरोबरच शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत असतात, असे मत विलास लांडे यांनी व्यक्त करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाच्या आवारात पार पडलेल्या या कार्यक्रमाला व्याख्याते गणेश शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.