बारामती -करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने गरजूंसाठी बारामती नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तांदूळवाडी तसेच न्यू अक्षदा मंगल कार्यालय मोरगाव रोड येथे शिवभोजन थाळीची व्यवस्था केलेली आहे. थाळीची किंमत पाच रुपये ठेवण्यात आली आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजारसमिती नंतर बारामती तालुका सहकारी दूध संघ व बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शासकीय शिव भोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे. खरेदी-विक्री संघाच्या वतीने तांदूळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत तर दूध संघाच्या वतीने मोरगाव रोड येथील न्यू अक्षदा मंगल कार्यालय येथे शिवभोजन थाळी सुरू करण्यात आले आहे.
शिवभोजन थाळीचा लाभ गरजूंनी घेण्याचे आवाहन प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे. यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, नगरसेवक जय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, नगरसेवक समीर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
बारामती शहरात तीन ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. केवळ पाच रुपयात ही थाळी देण्यात येत आहे. तांदूळवाडी तसेच इतर ठिकाणी देखील गरजूची संख्या जास्त आहे. त्यामुळे शासनाने 150 थाळींची मर्यादा वाढवून 300 करावी.
-जय पाटील, नगरसेवक बारामती