182 जण झाले होते सहभागी; उर्वरितांचा तपास गतीने सुरू
पुणे – दिल्लीमधील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ट झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील 182 जणांची यादी प्राप्त झाली आहे. युद्धपातळीवर त्यांचा शोध घेत त्यातील 106 जणांना शोधून त्यांना रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. तर, उर्वरितांचा शोध गतीने सुरू आहे.
निजामुद्दीन येथील तबलिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील 136, सातारा जिल्ह्यातील 5, सांगली जिल्ह्यातील 3, सोलापूर जिल्ह्यातील 17 व कोल्हापूर जिल्ह्यातील 21 जणांचा समावेश होता. या माहितीची छानणी करताना त्यातील नावे दुबार आढळून आली आहेत. तसेच, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त 7 व्यक्ती आहेत. 182 पैकी 106 जण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 70, सातारा जिल्ह्यातील 5, कोल्हापूर जिल्ह्यातील 10 व सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांतील 106 जणांना ट्रेसिंग करून त्यातील 94 जणांना क्वारंटाईन केले आहे. त्याचे स्त्रावनमुने घेतले जातील. त्या स्त्राव नमुना अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
सीमकार्ड बदलले गेल्याने अडचण
प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीतील 51 व्यक्तींच्या कॉल रेकार्डनुसार ते बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे तर उर्वरित तपास गतीने सुरू आहे. काही प्रकरणात काहींनी भ्रमणध्वनी सिमकार्ड बदलले असल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना शोधण्यात अडचण येत आहे. काही राज्यांच्या किंवा इतर जिल्ह्यांत ज्यांचे संपर्क आढळून आले ती माहिती संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पुण्यातील 51 जण इतर राज्यांतील असल्याची माहिती मिळाली असून या संदर्भात खात्री केली जात आहे. पुणे विभागातील 182 जणांचा तपास सुरू असून ते विभागात असतील तर त्यांना क्वारंन्टाईन करण्यात येईल व त्यांचे स्त्राव नमुने घेतले जातील. स्त्राव नमुन्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल.
विशेष पथकांद्वारे पोलिसांचा शोध
मेळाव्यात सहभागी झालेले लोक हे देशाच्या विविध भागांत पसरले असल्याने त्यांना शोधून त्यांची तपासणी करत त्यांना रुग्णालयात दाखल करणे हे पोलिसांसमोरील एक आव्हान निर्माण झाले आहे. मोठ्या संख्येने करोना बाधित सदर मेळाव्याचे ठिकाणी मिळून आल्याने पुरेशी सुरक्षा पोलिसांनाही घ्यावी लागत आहे. केवळ ठराविक माहितीच्या आधारे संबंधीत लोकांना शोधण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे.
याकरिता पोलिसांनी विशेष पथके स्थापन करत संबंधितांचा तपास सुरू केला असून पोलिसांसोबत वैद्यकीय पथकेही ठेवली आहे. वैद्यकीय पथकांनी तपासणी केल्यानंतर सदर लोकांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत सांगितले जात असल्याची माहितीस पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दुजोरा दिला आहे.