शिरूर -येथील सय्यद बाबानगरात 36 वर्षीय करोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या 57 जणांना होम क्वारंटाइन केले आहे. या महिलेच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या 14 जणांचे स्वॅब करोना तपासणी करिता घेतले आहेत.त्यांचे अहवाल उद्या दुपारपर्यंत येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शिरूरकरांची धाकधूक कायम राहणार आहे.
तिच्या व तिच्या नातेवाइकांच्या संपर्कात आलेले सय्यदबाबा नगर, बॅकवर्ड हाउसिंग सोसायटी, रेव्हेन्यू कॉलनी, सैनिक सोसायटी अशा ठिकाणी एकूण 57 जणाना क्वारंटाइन केले आहे. शिरूर नगरपरिषदेच्या वतीने सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर केले असून, 14 दिवस सर्व रस्ते बंद केले आहेत.
शिरूर शहरात असणाऱ्या कोविड केअर सेंटर येथून आज 35 जणांचे करोना तपासणीकरिता नमुने पाठवण्यात आले असून त्यात शिरूर येथील 14, पाबळ येथील 21 जणांचा समावेश आहे. शिरूर तालुक्यातील बाबुराव नगर, गणेगाव खालसा, शिरूर जवळील रामलिंग, रांजणगाव गणपती, शिक्रापूर व कोरेगाव भीमा येथील दहा करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले.