मुंबई – विनोदी भूमिकांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने येथील राहत्या घरी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. जगदीप यांचे खरे नाव सय्यद इश्तियाक अहमद जाफरी असे होते. ते काही दिवसांपासून आजारी होते. दरम्यान, दक्षिण मुंबईतील माझगाव परिसरातील के. सिया कब्रस्थानमध्ये सकाळी अकरा ते बाराच्या सुमारास जगदीप यांना सुपुर्द-ए-खाक केलं जाईल. त्यांच्या अंत्यसंस्काराला कुटुंबीय आणि निकवर्तीयच उपस्थित असतील.
सैयद इश्तियाक अहमद जाफरी उर्फ जगदीप यांचा जन्म 1939 मध्ये झाला होता. बाल कलाकार म्हणून त्यांनी बी.आर. चोप्रा यांच्या ‘अफसाना’मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. बाल कलाकार म्हणून त्यांनी अब दिल्ली दूर नहीं, मुन्ना, आर-पार, लैला मजनू, दो बीघा जमीन आणि एक पंछी एक डाल यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं.यानंतर भाभी, बरखा, बिंदिया या सिनेमांमध्ये जगदीप मुख्य अभिनेता म्हणून झळकले. परंतु विनोदी कलाकार म्हणून त्यांना जास्त पसंती मिळाली. 1975 मधला सुपरहिट चित्रपट ‘शोले’मधील ‘सूरमा भोपाली’ हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.
जगदीप यांनी ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातून विनोदी कलाकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांचा अखेरचा चित्रपट ‘गली गली चोर है’ हा होता, जो 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. तसंच त्यांनी ‘सूरमा भोपाली’ नावाच्या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं होतं. जगदीप यांनी तीन बहूरानियां, खिलौना, फुद्ददू, सास भी कभी बहू थी, गोरा और काला, बिदाई, आईना, एजेंट विनोद, युवराज, सुरक्षा, एक बार कहो, फिर वही रात, मोर्चा, कुर्बानी, पुराना मंदिर, शहंशाह, फूल और कांटे, अंदाज अपना अपना, चायना गेट यांसारख्या सुमारे 400 सिनेमात अभिनय करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर त्यांची मुलं जावेद जाफरी आणि नावेद जाफरी तसंच नातून मिजान जाफरीने अभिनयाच्या विश्वात पदार्पण केले.
जगदीप यांनी सुमारे 400 चित्रपटांत अभिनय केला. प्रचंड गाजलेल्या शोले चित्रपटातील सुरमा भोपाली या भूमिकेने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. नंतर त्याच नावाचा एक चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केला.’पुराना मंदिर’ या चित्रपटातील त्यांची भूमिकाही उल्लेखनीय ठरली. त्याशिवाय, अंदाज अपना अपना या चित्रपटात त्यांनी आघाडीचा अभिनेता सलमान खान याच्या वडिलांची भूमिका साकारली. अभिनेते जावेद आणि नावेद जाफरी यांचे जगदीप हे वडील होत.