जागांचे मूल्यांकन रु. 410 कोटीच : रेडीरेकनरनुसारच ग्राह्य धरणार मूल्य
पुणे – महापालिकेने मेट्रो प्रकल्पासाठी दिलेल्या जागांचे मूल्यांकन 410 कोटी रुपयेच असल्याचे महामेट्रोने अखेर मान्य केले आहे. महामेट्रोने या जागांचे मूल्यांकन 2015 च्या रेडीरेकनरनुसार केले होते. त्यामुळे ते 157 कोटी रुपयांचे झाले होते. मात्र, महापालिकेने या मूल्यांकनास आक्षेप घेत वारंवार कळवले. त्यानंतर अखेर महामेट्रोने चूक मान्य केली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पालिकेच्या हिश्श्यातून ही 410 कोटी रुपयांची रक्कम वळती केली जाणार आहे.
सुमारे साडेअकरा हजार कोटींच्या प्रकल्पात पालिकेचा हिस्सा 951 कोटींचा आहे. हा खर्च मेट्रोला जागेच्या मोबदल्यात दिला जाणार आहे. हा निधी महापालिकेने टप्प्याटप्प्याने तातडीने उपलब्ध करून द्यावा, असे पत्र महामेट्रोने पालिकेस दिले होते. तसेच पालिकेच्या हिश्श्यांच्या रकमेसाठी तगादा लावला होता. तर, महामेट्रोने पालिकेने आतापर्यंत दिलेल्या जागांचे मूल्यांकन 157 कोटी असल्याचे कळवले होते.
मात्र, महामेट्रोने जागांचे मूल्य 2015 च्या रेडीरेकनुसार करून पालिकेचा हिस्सा कमी दाखवल्याचा प्रकार लक्षात येताच महापालिकेच्या भूसंपादन विभागाने यावर आक्षेप घेतला. 2008 च्या जागावाटप नियमानुसार जागा हस्तांतरित करताना अथवा भाडे कराराने देताना चालू रेडीरेकनरनुसारच दर असावा, अशी तरतूद आहे. तसेच जिल्हा प्रशासनानेही आपल्या जागा मेट्रोला देताना चालू वर्षाच्या रेडीरेकनर दराने महामेट्रोला दिल्याचेही निदर्शनास आणून दिले.
पालिकेच्या जागांचे मूल्यांकन 410 कोटी रुपये असल्याचे महामेट्रोने मान्य केले आहे. त्यानुसार, पालिकेच्या हिश्श्यातून ही रक्कम वजा केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेचे तब्बल 250 कोटी रुपये वाचले आहे. मेट्रोने मूल्यांकन कमी दाखवल्याचे निदर्शनास आल्यानंतर मागील वर्षभरापासून त्यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर त्याला यश आले असून महापालिकेसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे.
– राजेंद्र मुठे, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग, मनपा