मुस्लिम समाजाच्या वतीने प्रशासनाला सहकार्य करणार असल्याची ग्वाही
शिरूर(प्रतिनिधी) – सध्या सगळीकडे कोरोना व्हायरस संसर्गाने थैमान घातले असून, या काळात मुस्लिम बांधवांनी प्रशासनाला मदत करावी, पवित्र रमजान महिन्याचे ईदचे नमाज पठण यंदाच्या वर्षी घरातच करावे व सोशल डिस्टन्स नियम पाळावे, असे आवाहन शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी मुस्लीम समाजाला केले आहे. तर मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व प्रकारच्या नियमांसह प्रशासनाला सहकार्य करण्याचे व रमजान ईद नमाज पठण घरातच करणार असल्याची ग्वाही देण्यात आली.
कोरोना व्हायरस संसर्गाच्या काळात पवित्र रमजान महिना आला असून या महिन्याचा शेवटचा दिवस रमजान ईद 25 मे रोजी असल्याने शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने मुस्लिम बांधव व पोलीस स्टेशन यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष एकबालभाई सौदागर,माजी उपनगराध्यक्ष व मुस्लिम समाजाचे नेते जाकीरखान पठाण, मुस्लिम समाजाचे फिरोजभाई बागवान, मुस्ताकभाई शेख, हाफिज बागवान, एजाज बागवान, राहील शेख उपस्थित होते.
कोरोना व्हायरस आजार अतिशय गंभीर असून या काळात पवित्र रमजान महिना आला आहे. रमजान ईद 25 मे रोजी असून अद्याप आपल्यावरील कोरोनाव्हायरस धोका टळलेला नसल्याने या काळात मुस्लिम बांधवांनी पोलीस प्रशासनाला मदत करावी व पवित्र रमजान ईद चे नमाज पठण प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आपल्या घरात करावे, मज्जिद व इतर ठिकाणी गर्दी करु नये, सोशल डिस्टन्स पाळावे, यंदाच्या वर्षी आलिंगन देऊन एकमेकांना भेटू नये, हस्तांदोलन करून ईदच्या शुभेच्छा देऊ नये व प्रत्येकाने मास्क वापरावे असे आव्हान पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी मुस्लिम बांधवांना केले.
शिरूर मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला संपूर्णपणे सहकार्य राहणार असून कुठल्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन करणार नाही असे आश्वासन देण्यात आले, असे इक्बालभाई सौदागर (अध्यक्ष, मुस्लिम समाज शिरूर) यांनी यावेळी सांगितले.
मुस्लिम समाजाच्या वतीने सोशल डिस्टन्ससह शिरूर प्रशासनाला, पोलीस प्रशासन यांना संपूर्णपणे सहकार्य करण्याची आश्वासनही यावेळी देण्यात आले.कोरोनासारख्या आजारासाठी सर्व शिरूर शहर व तालुक्यातील मुस्लिम समाज शासनाच्या बरोबर आहे. असे जाकीरखान पठाण (माजी उपनगराध्यक्ष ) यांनी सांगितले.