जांबूत (प्रतिनिधी) :- येथील सचिन बाळू जोरी (वय 38) या बेपत्ता असलेल्या तरूणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून समोर आली आहे. यावेळी घटनास्थळी शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सुनिल उगले, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका घुगे आदी उपस्थित होते.
हा तरूण गेली पाच दिवसांपासून बेपत्ता होता. यासंदर्भात शिरूर पोलीस स्टेशन येथे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. गुरूवारी (दि. 1) काही तरूणांना तरूणाची कपडे व चपला जांबूत-वडनेर खुर्द रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ओढ्यानजीक आढळून आल्या. शेजारी उसाच्या शेतात शोधाशोध केली असता फरफट आणि बिबट्याचे पाऊल आढळून आले.
यावेळी उसाच्या सरीत एका बाजूला अर्धे खाल्लेले व कुजलेल्या अवस्थेतील शरीर, डोक्याची कवटी व हात अशा स्वरूपात मृतदेह आढळून आला. यावेळी संबंधित वनविभाग, पोलीस प्रशासन यांना माहिती देण्यात आली. तात्काळ संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होऊन पंचनामा करून पुढील तपासणीसाठी मृतदेहाचे नमुने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत.
यावेळी घटनास्थळी भिमाशंकरचे संचालक प्रदिप वळसे पाटील, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, टाकळी हाजीचे माजी सरपंच दामू घोडे, जांबुतचे सरपंच दत्तात्रय जोरी, पोलीस पाटील राहुल जगताप यांचेसह वनविभाग आणि पोलीस कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेपत्ता महिलेचाही शोध घ्या
ही घटना अतिशय दुर्दैवी असून अशा प्रकारच्या घटनांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांनी स्वतःची योग्य काळजी घ्यावी. असे आवाहन माजी सरपंच दामू घोडे यांनी केले. तसेच बुधवारी (दि. 31) जांबूत येथून बेपत्ता असलेल्या वयोवृद्ध महिलेचा देखील तात्काळ शोध घेण्यात यावा, अशा सूचना घोडे यांनी दिल्या.
वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर म्हणाले, संबंधित मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून प्राथमिक तपासासाठी मृतदेहाचे नमुने घेण्यात येणार आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल.