#लोकसभा2019 : शिरूर, मावळमध्ये 59 टक्‍के मतदान

आढळराव, बारणे, पार्थ पवार व कोल्हेंचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

पुणे – पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी शांततेत मतदान झाले. शिरूर लोकसभा मतदारसंघात 59.55 टक्के तर मावळात 59.12 टक्‍के मतदान झाले. शिरूरमध्ये शिवसेना-भाजपकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून डॉ. अमोल कोल्हे यांच्यामध्ये लढत आहे. तर मावळमधून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पार्थ पवार आणि शिवसेना-भाजपकडून श्रीरंग बारणे हे निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतदान यंत्रात बंद झाले आहे. दरम्यान, सर्व लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी दि. 23 मे रोजी होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग आदी उपस्थित होते. शिरूर लोकसभा मतदारसंघात 21 लाख 73 हजार मतदार तर 2 हजार 296 मतदान केंद्र होती. तर मावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख 97 हजार मतदार तर 2 हजार 504 मतदान केंद्र होती. शिरूर लोकसभा मतदारसंघातून 23 उमेदवार तर मावळ मतदारसंघातून 21 उमेदवार रिंगणात आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरी आणि हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. तर मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. शिरूर व मावळ लोकसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. ग्रामीण व शहरी भागात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी असल्याचे पहायला मिळाले. मतदारांमध्ये उत्साह असल्याचे दिसून आले.

आंबेगावमध्ये सर्वाधिक मतदान

सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिरूर लोकसभा मतदारसंघात 58.4 टक्के मतदान नोंदविले गेले. यामध्ये सर्वाधिक मतदान आंबेगाव विधानसभा मतदारसंघात 67 टक्के त्या खालोखाल जुन्नरमध्ये 61 टक्के मतदान झाले. तर शिरूरमध्ये 60 टक्के, खेडमध्ये 59 टक्के, भोसरीमध्ये 54 टक्के आणि हडपसरमध्ये 54 टक्के मतदान झाले.

उरणमध्ये 61.8 टक्के मतदान

मावळ लोकसभा मतदारसंघात 58.21 टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान उरणमध्ये 61.8 टक्के तर मावळमध्ये 62.28 टक्के मतदान झाले. पनवेलमध्ये 55.3 टक्के, कर्जतमध्ये 60.4 टक्के, चिंचवडमध्ये 57.3 टक्के आणि पिंपरीमध्ये 56.3 टक्के मतदान झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.