शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर शहरात आज विविध चार भागांमध्ये चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, काल शिरूरमध्ये एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता त्यामुळे शिरूर शहराला दिलासा मिळाला होता, परंतु आज पुन्हा नव्याने चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शहराची धाकधूक पुन्हा एकदा वाढली आहे.
शिरूर शहरातील भाजीबाजार येथील ३३ वर्षीय पुरुष, सिद्धार्थनगर येथील २५ वर्षीय महिला, यशवंत कॉलनी येथील 40 वर्षीय व्यापारी, सुभाष चौक येथील कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेला 21 वर्षीय तरुण असे शिरूर शहरात एकूण चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
शिरूर शहरातील नागरिक, व्यापारी यांनी आपला व्यवसाय करताना मास्क वापरावे, सोशल डिस्टन्स ठेवावे, सॅनिटायजरचा वापर करावा, गर्दी करू नये, साबणाने हात धुवावे, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन शिरूर नगरपालिका मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.