नगर -केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात देशातील कचरामुक्त स्वच्छ शहरांचे स्टार रेटिंग जाहीर केले आहे. त्यात नगर जिल्ह्यातील शिर्डी व देवळाली प्रवरा शहरांना थ्री स्टार, तर नगर शहर व संगमनेर शहराला सिंगल स्टार मानांकन मिळाले आहे.
या स्टार रेटिंगमध्ये महाराष्ट्र देशातील सर्वोत्तम राज्य ठरले आहे. देशभरात सिंगल स्टार, थ्री स्टार, फाईव्ह स्टार व सेव्हन स्टारनुसार रेटिंग देण्यात आले आहे. देशपातळीवरील 141 सर्वोत्तम कचरामुक्त स्वच्छ शहरात महाराष्ट्रातील 76 शहरांचा समावेश आहे. यात नवी मुंबई या एकमेव शहराने फाईव्ह स्टार, 34 शहरांनी थ्री स्टार, तर 41 शहरांनी सिंगल स्टार रेटिंग पटकावले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत राज्याच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे.
गेल्या तीन वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही शिर्डीच्या साईनगरीने स्वच्छतेतील आपला दबदबा कायम राखला आहे. यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणमध्ये शिर्डी नगरपंचायतीने थ्री स्टारमध्ये स्थान पटकावले आहे. आमदार राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखालील शिर्डी नगरपंचायतीने स्वच्छतेत राष्ट्रीय पातळीवर सलग तीन वर्षे आपली गुणवत्ता कायम राखली आहे. शहर स्वच्छतेसाठी नगराध्यक्षा अर्चना कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने स्वच्छतेत अव्वल राहण्यासाठी परिश्रमाची पराकाष्टा केली.
साईनगरी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. काही वर्षांपूर्वी येथील अस्वच्छतेबाबत मनात सल होती. अस्वच्छतेचा कलंक धुवून काढण्यासाठी पदाधिकारी व प्रशासनाने मनापासून कष्ट केले. नागरिकांनी यासाठी पुरेपूर साथ दिली. साईनगरी साईबाबांबरोबरच स्वच्छतेचेही प्रतीक व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे, असे मत आ. विखे यांनी व्यक्त केले.
देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या नेतृत्वाखाली, तर संगमनेरमध्ये नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेचे प्रभावी काम करण्यात आले. नगर महापालिकेत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी नगर शहराला थ्री स्टार मानांकन मिळावे, यासाठी प्रयत्न केले. तब्बल महिनाभर त्यांनी अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी देखील स्वच्छतेच्या कामासाठी वर्ग केले होते. त्यामुळे आज नगर शहराला सिंगल स्टार मानांकन मिळाले आहे.