वाघोली (प्रतिनिधी): शिरसवडी तालुका हवेली येथे एकाच गावात सहा वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणारे ग्रामसेवक आर. आर.दवणे ग्रामपंचायतीचे कामकाज शासन नियमानुसार करत नसल्याचा आरोप करत ग्रामसेवकाची बदली करण्याची मागणी पाच ग्रामपंचायत सदस्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात ग्रामपंचायत सदस्यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायत सदस्यांना सभांचे प्रोसिडिंग संबंधित ग्रामसेवक दाखवत नाही व सदर प्रोसिडिंग वेळोवेळी पूर्ण करीत नाहीत. ग्रामपंचायतीच्या जमाखर्चाचा हिशोब ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना ग्रामसेवक सादर करीत नाही व तो हिशोब अद्यावत ठेवत नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.
याशिवाय ग्रामपंचायत सदस्यांच्या परस्पर काही ठराव स्वतः ग्रामसेवकांनी केल्याचे देखील ग्रामपंचायत सदस्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सहा वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवकाची बदली करण्याची मागणी शिरसवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच लता ज्ञानेश्वर गावडे, उपसरपंच रमेश नानासाहेब कदम, सदस्य दीप्ती सतीश नागवडे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा महादेव चितळकर, सदस्य बाळासाहेब वामन गावडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
माझी बदली झालेली आहे. फक्त चार्ज देणे बाकी आहे.
आर.आर. दवणे
ग्रामसेवक