मुंबई: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अस विधान त्यांनी केलं आहे. पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या विधानानंतर राजकारण चांगलंच पेटलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी पडळकर यांना जोरदार उत्तर दिले आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, मंडल आयोग,नामविस्तार, बहुजनांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवून शरद पवार यांनी आम्हा बहुजनांच्या आयुष्याचं सोनं केलं हे महाराष्ट्राला वेगळे सांगण्याची गरज नाही. पण भाजपने दिलेल्या आमदारकीची परतफेड करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांना वायफळ गोष्टी कराव्या लागतात हे वाईट वाटतं.
राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की शरद पवारांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो!