Ambuja Cement Share Price – अंबुजा सिमेंट या कंपनीच्या शेअरचा भाव सकाळी मोठ्या प्रमाणात वाढून 52 आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर गेला होता. मात्र शेअर बाजारातील एकूणच नकारात्मक वातावरण पाहून दुपारच्या सत्रामध्ये गुंतवणूकदारांनी विक्री करून नफा काढून घेतल्यामुळे या कंपनीच्या शेअरचा भाव कालच्या तुलनेत काही प्रमाणात कमी झाला.
सकाळी या शेअरची किंमत चार टक्क्यांनी वाढून 640 रुपयावर गेली होती. नंतर कालच्या तुलनेत शेअरचा भाव 0.11 टक्क्यांनी घसरुन 616 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला. अदानी कुटुंबीयांनी अंबुजा सिमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरचा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र शेअर बाजारात एकूणच नकारात्मक वातावरण असल्यामुळे त्याचा या शेअरवर परिणाम झाला.
काही वर्षापूर्वी अदानी कुटुंबीयानी अंबुजा सिमेंट या कंपनीचे अधिग्रहण केले होते. काल अंबुजा सिमेंटमध्ये अदानी कुटुंबीयांनी आणखी 8,339 कोटी रुपये गुंतविले आहेत. त्यामुळे अंबुजा सिमेंटमधील अदानी कुटुंबीयांचा वाटा आता 70.3% वर गेला आहे. या अगोदरही अदानी कुटुंबीयांनी अंबुजा सिमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. गेल्या दोन वर्षात झालेली एकूण गुंतवणूक आता वीस हजार कोटी रुपयांवर गेली आहे.
भारतात पायाभूत सुविधा क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. अशा परिस्थितीत भारतात सिमेंटची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अंबुजा सिमेंटची सध्याची उत्पादन क्षमता 76.1 दशलक्ष टन एवढी आहे. 2028 पर्यंत अंबुजा सिमेंटची उत्पादन क्षमता वाढून 140 दशलक्ष टन करण्याचा संकल्प अदानी उद्योग समूहाने केला आहे. गेल्या दोन वर्षात केलेल्या 20,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे अंबुजा सिमेंट कंपनीची उत्पादन क्षमता वाढेल असे सांगण्यात येते.