शिक्रापूर, (वार्ताहर)- शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी नेहमीच वेगवेगळ्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवत असताना या शाळेतील तीन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापिका साधना शिंदे यांनी दिली आहे.
शिक्रापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शाळेतील विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता. निवड झाल्यानंतर ६ वी ते १२ वी पर्यंत जवाहर नवोदय विद्यालयात केंद्र शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते.
शिक्रापूर शाळेतील मयूर ज्ञानेश्वर डोईफोडे, अथर्व राजेंद्र वाखरे, स्वरांजली कांतीलाल जाधव या तीन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना अरुचना मांढरे, संजय थिटे, वर्षा जकाते, पांडुरंग नाणेकर, बबन पुंडे, मनीषा मोरे सुरेखा गिरवले या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे तत्कालीन मुख्याध्यापिका रतन मंडलिक, प्रभारी मुख्याध्यापिका साधना शिंदे, केंद्रप्रमुख प्रकाश लंघे, विस्ताराधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सनी जाधव, सरपंच रमेश गडदे, आदी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.