शिक्रापूर – येथे मुंबई येथून आलेल्या दोघांना करोनाची लागण झाल्याचे बुधवारी (दि. 27) स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली असून शिक्रापूर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. शिक्रापूर येथील कुटुंब कामानिमित्ताने घाटकोपर मुंबई येथे सध्या स्थायिक आहे. हे कुटुंब लॉकडाऊनमुळे शिक्रापुरातील राऊतवाडी येथे आले होते. त्यातील दोघे पुन्हे मुंबईला गेले व पुन्हा राऊतवाडी येथे आले त्यांना त्रास जावणू लागल्याने त्यांची तपासणी केली असता ते दोघेही पॉझिटिव्ह आढळले आहेत.
याबाबत माहिती मिळताच शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, ग्रामविकास अधिकारी बी. बी. गोरे आदींनी हे करोनाबाधित राहात असलेल्या परिसरात भेट देऊन शिक्रापूर राऊतवाडी परिसरात शिक्रापूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून फवारणी सुरू करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार म्हणाले की, शिक्रापूर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
विनाकारण बाहेर फिरू नये तसेच, बाहेर गावाहून येणाऱ्या नातेवाइकांची व्यवस्था विलगीकरण कक्षात करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. करोनाबाधितांच्या कुटुंबातील इतर पाच व्यक्तींना तपासणीसाठी पाठविले असून इतर माहिती घेतली जात आहे.
– डॉ. राजेंद्र शिंदे, वैद्यकीय अधिकारी,शिरूर तालुका