शेवगाव (प्रतिनिधी) : करोना महामारीला आळा घालण्यासाठी विविध शैक्षणिक, सामाजिक, एनजीओच्या संस्था तथा प्रशासकीय पातळीवर जनजागरणाचे मोठे कार्य झाले आहे. स्वयम् शिस्तीसाठी वेळोवेळी अद्यापही लॉक डाउन जारी केले जात आहे. मात्र लॉक डाउन शिथील होताच लोक सर्व विसरून लगेच नियमाचे उल्लंघन करत गर्दी करून एक प्रकारे करोनाला निमंत्रणच देतात. हे वास्तव आहे. अशावेळी दंडात्मक कारवाई शिवाय पर्याय राहत नसल्याने या काळात शेवगाव पोलीस प्रशासनाने तब्बल ४७२ जणांविरुद्ध ३७५ गुन्हे दाखल केले आहेत. तर नगरपरिषदेने याच काळात आज अखेर ७०० जणांवर थेट दंडात्मक कारवाई करून २ लाख ३५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
या काळात सर्वसामान्यांना कोव्हिड १९ या गंभीर आजारा संदर्भात विविध माध्यमातून सातत्याने जागृत करण्यात आले आहे. मोबाईलवर तर इतके हॅमरींग केले गेले की लोक ते ऐकण्यास वैतागले होते . अत्यंत तातडीचे कामासाठी कॉल केला तरी प्रथम कोव्हिड विषयी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात पूर्ण कॅसेट सक्तीने ऐकावीच लागे. यावर माध्यमात, मुले बुडत असताना असहाय्य दिव्यांग पित्याने मदत मिळावी म्हणून मोबाईल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रथम कोव्हिडची कॅसेट लागल्याने मुले बुडाल्यानंतरच समोरच्याला निरोप समजला ! असा मिस्कील विनोद व्हायरल झाला होता !.
इतके जनजागरण झाले तरी लोक याबाबत गांभीर्याने न घेता नियम धाब्यावर बसवताना आढळतात . अशावेळी दंडात्मक कारवाई शिवाय पर्याय नसतो .विभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सोपान गोरे, पावरा, गुप्तवार्ता विभागाचे राजीव चव्हाण यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत विविध नियमांचे उल्लंघन झाल्या नुसार संबंधितांवर ३७५ गुन्हे दाखल केले आहेत .
त्यात वेळेव्यतिरिक्त दुकान उघडे ठेवल्याबद्दल २० आरोपीविरुद्ध १६ गुन्हे, मोटरसायकलवर विनाकारण फिरणाऱ्या विरूध्द ७१, टारगटा विरुद्ध १९ गुन्हे तर विनाकारण गर्दी करणाऱ्या २३ जणांविरुद्ध ८ गुन्हे, करोना असतानाही विनापरवाना तालुक्यात येऊन राहिलेल्या १९ जणांविरुद्ध ७ गुन्हे, धार्मिक स्थळ बंदी असतांनाही तेथे गर्दी करणाऱ्या ६ आरोपीविरुद्ध एक गुन्हा तसेच विलगीकरण कक्षाचे आदेश न पाळणाऱ्या ४ आरोपी विरुद्ध २ गुन्हे, जमाव बंदी मोडून मोर्चा काढणार्या ३ जणांवर तर मावा विकणाऱ्या ५ आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या ३२१ व्यक्तिवर ३१६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा एकूण ३७५ गुन्ह्यातील ४७२ व्यक्तींना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांचे मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शहरात प्रमुख चौकात पथके तैनात करून मास्क न वापरणाऱ्या विरुद्ध तसेच वेळेव्यतिरिक्त दुकानदारी करणार्याविरुद्ध थेट दंडात्मक कारवाई केली आहे. नगरपरिषदेने या काळात ७०० जणांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल २ लाख३५ हजार दंड वसूल केला आहे.