पोर्टलॅन्ड, (अमेरिका) – अमेरिकेतील ओरेगॉन प्रांतातील पोर्टलॅन्डमध्ये शनिवारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. कृष्णवर्णिय व्यक्तींच्या हत्येनंतर सुरू झालेल्या ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ च्या आंदोलकांनी ट्रम्प समर्थकांच्या 600 वाहनांच्या ताफ्याला विरोध केल्याने हा हिंसाचार उसळला.
या हिंसाचारादरम्यान एका व्यक्तीचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. या हिंसाचारादरम्यान गोळीबार झाला की पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा व्यक्ती मरण पावला, हे समजू शकले नाही.
गेल्या तीन महिन्यंपासून पोर्टलॅन्डमध्ये हिंसक आंदोलन आणि जाळपोळीच्या वेगवेगळ्या घटना घडत आल्या आहेत. मे महिन्यापासून आतापर्यंत शेकडो आंदोलकांना स्थानिक प्रशासन आणि एफबीआयने अटक केली आहे. शनिवारी पोर्टलॅन्डमध्ये होणाऱ्या “ब्लॅक लाईव्हज मॅटर’च्या रॅलीच्या पार्श्वभुमीवर पोलिसांनी काही जणांना अटक देखील केली होती. तसेच रॅलीच्या भागात नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहनही केले होते.
दोनच दिवसांपूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ट्रम्प यांनी पोर्टलॅन्डला हिंसक क्षेत्र संबोधले होते. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या समर्थकांनीही या भागातून रॅली काढली होती. ट्रम्प समर्थकांनी बोइस, इदाहो या भागातही गेल्या आठवड्यात अशीच् रॅली काढली होती. ट्रम्प विरोधकांनी पोर्टलॅन्डमधील रॅली आडवण्याचा प्रयत्न केल्यावर हा हिंसाचार उसळला.