नवी दिल्ली: जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानंतर “लष्कराने नागरिकांचा छळ करून काश्मीर खोऱ्यातील लोकांची घरे लुटल्याचा” ट्विटरवरून आरोप करणाऱ्या पीपल्स मुव्हमेंटच्या नेत्या शेहला रशीद यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्य आला आहे.
भारतीय लष्कराची प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटय़ा बातम्या पसरवल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान शेहला यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले होते की, चार जणांना लष्कराच्या शोपियाँ येथील छावणीत बोलावून छळ करीत जाबजबाब घेण्यात आले. रात्री लष्कराचे जवान लोकांच्या घरात घुसले व त्यांनी लुटालूटही केली.
यावर हे सर्व आरोप चुकीचे व बनावट असल्याचे सर्वोच्च न्यायालयातील वकील आलोक श्रीवास्तव यांनी दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते. तक्रार दाखल झाल्यावर या प्रकरणाचा तपास विशेष विभागाकडे देण्यात आला होता, त्यानंतर रशीद यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.