प्रशिक्षकपदी शास्त्रीच योग्य – विराट कोहली

मुंबई – भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून मी सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचीच शिफारस करीन असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले. मात्र याबाबतचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळानि नियुक्त केलेली समितीच घेईल असेही त्याने मत दिले.

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यापूर्वी कोहली याने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी कोहलीने सांगितले की, शास्त्री यांनी आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. त्यांनी चांगल्या रीतीने संघबांधणी केली आहे. संघातील खेळाडूंसमवेत त्यांनी उत्तम सुसंवाद साधला आहे. प्रत्येक खेळाडूचा त्यांचा बारकाईने अभ्यास आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक खेळाडूला आपल्या कुटुंबाचाच एक सदस्य म्हणून ते प्रेम करीत असतात. त्यामुळेच मी पुन्हा त्यांची नियुक्ती करण्यासाठी शिफारस करीन.

कोहली पुढे म्हणाला की, विश्‍वचषक स्पर्धेतील पराभव इतिहासजमा झालेला आहे. या स्पर्धेत झालेल्या पराभवापासून आम्हाला खूप काही शिकावयास मिळाले आहे. आम्ही विंडीज दौऱ्यात सर्वोत्तम यश मिळविण्यासाठीच जात आहोत. या दौऱ्यात टी-20, एक दिवसीय सामने व कसोटी सामन्यांचा समावेश असल्यामुळे तेथे आमच्या खेळाडूंच्या कौशल्याची खरी परिक्षा असणार आहे. युवा खेळाडूंसाठी हा दौरा उपयुक्त आहे. आगामी टी-20 विश्‍वचषक स्पर्धेसाठी व भावी करिअरसाठीही या दौऱ्यातील अनुभव ही शिकवणीची शिदोरीच राहणार आहे. भारतीय संघात युवा खेळाडूंना अनुभवी खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळणार असल्यामुळे त्याचाही फायदा त्यांना मिळणार आहे. आमचा संघ अतिशय समतोल आहे.

वेस्ट इंडिज संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. तेथील खेळपट्ट्या त्यांच्या गोलंदाजांना अनुकुल राहण्याची शक्‍यता आहे. अर्थात या खेळपट्ट्यांवर प्रभावी मारा करण्याची क्षमता आमच्या गोलंदाजांमध्ये आहे. त्यामुळे आमच्यावर कोणतेही दडपण नाही असेही कोहलीने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.