86,000 मालमत्तांना शास्तीकर

महापालिकेने आजपर्यंत वसूल केले 242 कोटी 53 लाख रुपये


एक हजार चौरस फुटांच्या घरांना तब्बल 195 कोटी 6 लाख रुपयांची सवलत


54 हजार 531 मिळकती ठरल्या सवलतीच्या लाभार्थी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील 86 हजार 412 अवैध मालमत्तांना शास्तीकर (डबल टॅक्‍स) आकारण्यात आला आहे. महापालिकेने आजपर्यंत 242 कोटी 53 लाख रुपये शास्तीकर वसूल केला आहे. दरम्यान, एक हजार चौरस फुटाच्या शास्तीमाफीचा 54 हजार 531 मिळकतींना फायदा झाला आहे. त्यांना 195 कोटी 6 लाख रुपये सवलत देण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना कर संकलन विभागाने ही माहिती दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात एकूण पाच लाख 14 हजार 190 मालमत्ता आहेत. त्यामधील 4 लाख 36 हजार 285 निवासी मालमत्ता आहेत. महापालिका क्षेत्रात 4 जानेवारी 2008 नंतर झालेल्या अवैध बांधकामांना शास्तीकर लागू करण्यात आला होता.

राज्य सरकारने सुरवातीला शास्ती करामध्ये 600 चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांना माफी दिली होती. तर, 601 ते 1 हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांसाठी शास्तीकरात 50 टक्के सवलत दिलेली होती. दरम्यान, 4 मार्च 2019 रोजी सरकारने काढलेल्या आदेशानुसार एक हजार चौरस फुटापर्यंतच्या अवैध बांधकामांना शास्तीकरात माफी दिली आहे. शहरातील एकूण 86 हजार 412 मालमत्तांना शास्तीकर आकारण्यात आलेला आहे. शास्तीकरापोटी एकूण थकीत रक्कम 880 कोटी 72 लाख रूपये आहे. त्यापैकी 242 कोटी 53 लाख रूपये शास्तीकर वसूल झालेला आहे. एक हजार चौरस फुटाच्या शास्तीकर माफीच्या निर्णयाचा 54 हजार 531 मालमत्तांना फायदा झालेला आहे. त्यांना 4 नोव्हेंबर 2019 अखेर दिलेली सवलत 195 कोटी 6 लाख रुपये आहे.

1001 ते 2000 चौरस फूट निवासी क्षेत्रफळाच्या 12 हजार 89 मालमत्ता असून त्यांची एकूण थकबाकी 99 कोटी 83 लाख रूपये आहे. त्यापैकी अवैध बांधकाम शास्तीकर 31 कोटी 96 लाख रूपये आहे. 8 मार्च 2019 च्या सरकारी पत्रानुसार अवैध बांधकाम शास्तीमध्ये सवलत दिलेल्या तथापि, अद्याप मालमत्ता कर न भरलेल्या एकूण 45 हजार 644 मालमत्ता आहेत. त्यांच्याकडे एकूण थकीत 171 कोटी 74 लाख रूपये आहे. यामध्ये 31 कोटी 96 लाख रूपये इतक्‍या अवैध बांधकाम शास्तीकराचा समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.