रिलायन्सचे शेअर वधारले

केकेआरची रिलायन्स रिटेलमध्ये 5,500 कोटींची गुंतवणूक 

मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर अगोदरच उच्चांकी पातळीवर असताना आता रिलायन्स रिटेलमधील सव्वा टक्‍के भांडवल अमेरिकेतील केकेआर या गुंतवणूक कंपनीने घेतल्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर बुधवारी एक टक्‍क्‍याने वाढले.

केकेआर रिलायन्स रिटेलमध्ये 5,550 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स कंपनीच्या शेअरचे भाव एक टक्‍क्‍याने वाढल्यामुळे या कंपनीचे बाजारमूल्य एका दिवसात 12,485 कोटी रुपयांनी वाढून 15 लाख कोटी रुपयांवर गेले. विशेष म्हणजे केकेआर कंपनीने रिलायन्स जिओमध्ये 11,300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आजच्या व्यवहारानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, केकेआरने भारतीय उद्योगांमध्ये बऱ्याच दिवसांपासून विश्‍वासार्ह पद्धतीने गुंतवणूक केली आहे. या कपनीबरोबर आगामी काळात काम करण्यास आम्ही तयार झालो आहोत.

भारती एअरटेल पिछाडीवर
एकीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले असतानाच रिलायन्स जिओची स्पर्धक कंपनी भारती एअरटेलचे शेअर आठ टक्‍क्‍यांनी कोसळले. रिलायन्स जीओ कंपनीने गेल्या आठवड्यात आपल्या मोबाईल ग्राहकांसाठी पोस्टपेड योजना जाहीर केली आहे. यामुळे भारती एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांच्या ग्राहकांच्या संख्येत घट होईल असे गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.

शेअरबाजार निर्देशांकांत घट
जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आले तरी बुधवारी भारतीय शेअरबाजारात विक्री चालूच राहिली. त्यामुळे निर्देशांकांत घट झाली. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 65 अंकांनी म्हणजे 0.17 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 37,668 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 21 अंकांनी कमी होऊन 11,131 अंकांवर बंद झाला. टीसीएस, बजाज फायनान्स, टाटा स्टील, इंडसइंड बॅंक, पॉवर ग्रीड, ओएनजीसी या कंपन्यांचे शेअरचे भाव कमी झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही. अशा परिस्थितीतही ऍक्‍सिस बॅंक, इन्फोसिस, नेस्ले, एचडीएफसी बॅंकेचे शेअर वधारले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.