stock market updates: आज बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बँकिंग आणि वित्तीय समभागांच्या विक्रमी घसरणीने बाजारात खळबळ उडाली आहे. दोन्ही प्रमुख निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी 50 मध्ये मोठी घसरण झाली आहे. निफ्टी 50 मधील घसरण ही जून 2022 नंतरची सर्वाधिक आहे.
टेक स्टॉक्सने बाजाराला काही प्रमाणात आधार दिला. एचसीएल टेक सर्वाधिक 1.34 टक्क्यांनी मजबूत झाला. इन्फोसिस 0.55 टक्के, टेक महिंद्रा 0.54 टक्के आणि टीसीएस 0.38 टक्के वधारले तर दुसरीकडे एचडीएफसी बँक सर्वाधिक साडेआठ टक्क्यांनी घसरली. टाटा स्टील 4 टक्क्यांहून अधिक घसरले. कोटक बँक, अॅक्सिस बँक, आयसीएआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील आणि बजाज फिनसर्व्हचे समभाग 2.38 टक्के ते 3.66 टक्क्यांपर्यंत घसरण पहायला मिळाली.
बँक निफ्टीमध्ये आज सुमारे 2000 अंकांची घसरण दिसून आली. मार्च 2022 नंतर बँक निफ्टी निर्देशांकातील ही सर्वात मोठी एकाच दिवसातील घसरण आहे.
गुंतवणूकदारांचे 4.7 लाख कोटींचे नुकसान –
आज बाजारात HDFC बँक स्टाॅकमध्ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्सच्या 1600 अंकांच्या घसरणीत एकट्या HDFC बँकेच्या 950 अंकांचा सहभाग आहे. एचडीएफसी बँकेच्या गुंतवणूकदारांना आज एक लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. आजचा दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींसाठी सुमारे दीड वर्षातील सर्वात वाईट दिवस ठरला. यापूर्वी, देशांतर्गत बाजारात जून 2022 मध्ये अशी घसरण दिसून आली होती. बाजारातील एवढ्या मोठ्या घसरणीमुळे आजच गुंतवणूकदारांचे 4.7 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.