मुंबई – एकूण जागतिक परिस्थिती पाहता परकीय चलन संतुलित ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक आगामी काळात सोन्याची खरेदी वाढविण्याची शक्यता असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Reserve Bank Governor Shaktikanta Das) यांनी शुक्रवारी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर सुचित केले. मात्र रिझर्व्ह बँक आगामी काळात नेमके किती सोने खरेदी करणार आहे किंवा गेल्या वर्षी किती सोने खरेदी केले आहे यासंदर्भातील स्पष्ट आकडेवारी यावेळी दास यांनी दिली नाही. (Reserve Bank will increase gold purchase)
रिझव्हर्र् बँक सोन्याच्या साठयासंदर्भातील माहिती दर पंधरा दिवसांनी जारी करीत असते. त्यानुसार 22 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेकडे सोन्याच्या साठ्याचे मूल्य 51.487 अब्ज डॉलर इतके होते. गेल्या वर्षी म्हणजे मार्च 2023 अखेरीस भारताकडील सोन्याच्या मूल्यापेक्षा हे मूल्य 6.287 अब्ज डॉलरने जास्त आहे.
काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेने जानेवारी महिन्यात 8.7 टन सोने खरेदी केले आहे. गेल्या दोन वर्षात एखाद्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले नव्हते. आता रिझर्व्ह बँकेकडे 812.3 टन सोन्याचा साठा आहे. भारताकडील परकीय चलन साठ्याचे मूल्य आता 645.6 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेले आहे. त्यामुळे या आघाडीवर आता भारताची परिस्थिती कमालीची मजबूत आहे.