Sharad Ponkshe Son | मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. विविध मुद्दयांवर ते परखडप मत मांडताना दिसतात. सोशल मीडियावर देखील ते सक्रिय असतात. त्यांनी नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.
सिनेसृष्टीत मोठे यश मिळाल्यानंतर शरद पोंक्षे आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षे करणार आहे. त्यामुळे दोघेही बाप-लेक यानिमित्त एकत्र काम करताना दिसणार आहेत.
या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र या चित्रपटाद्वारे स्नेह पोंक्षे सिनेसृष्टीत करियर घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या टीमने नुकताच प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला आणि चित्रपटाचा शुभारंभ केला.
या चित्रपटाचं लेखनही स्नेह पोंक्षे यानं केले आहे. वि. एस. प्रोडक्शन्स व मोरया प्रोडक्शन यांच्या सहयोगानं प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची पूर्व तयारी सध्या ‘प्रॅाडक्शन नं १’ या नावानं होत असून रोहिणी विजयसिंह पटवर्धन या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत, तर शरद पोंक्षे सहनिर्माते आहेत.
यापूर्वी स्नेहने पाच वर्षं सह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. ही जबाबदारी उत्तमरित्या तो पार पाडेल, असा विश्वासही शरद पोंक्षे यांनी व्यक्त केला.