नाशिक – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काॅंग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समील झाला आहे. अजित पवार यांच्यासह 9 जणांनी 2 जुलैला मंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 9 जणांना आज खातेवाटप जाहीर झाले आहे. एनसीपीतील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे अन्न-नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवली आहे. या सगळ्या घडामोडीनंतर आज छगन भुजबळ यांच्या समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. आज नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या समर्थकांकडून जोरदार जल्लोष साजरा करण्यात येतोय.
जेसीबीतून फुलांची उधळण करुन छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. मंत्री झाल्यानंतर भुजबळ आपल्या मतदारसंघात पहिल्यांदाच आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून ढोल-ताशा वाजत, गुलाल-उधळत, नृत्य करत स्वागत करण्यात आले. मात्र यादरम्यान, अभिनंदनाच्या बॅनरवरून शरद पवार यांचा फोटो गायब झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा फोटो झळकतोय. तर शरद पवार यांचा फोटो गायब आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर आपला फोटो कोणी वापरावा याबाबत मत मांडलं होतं. त्यांनी अजित पवार यांच्या गटाला आपला फोटो वापरण्यास प्रतिबंध घातली होती. अजित पवार गटाने आपला फोटो वापरु नये, असं शरद पवार स्पष्ट म्हणाले होते. त्यानंतर आता नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या स्वागताच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो गायब झालेला बघायला मिळतोय.