राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक
मुंबई: लोकसभा निवडणूकीत 2014 प्रमाणे यंदाही झालेल्या पराभवाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलेच गांभीर्य घेतले आहे. पराभवाची कारणमिमांसा करण्याबरोबरच पवार आता पक्षाच्या आमदारांची तसेच पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार असून आगामी विधानसभा निवडणूकीची रणनितीही ठरविणार आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस महाआघाडीचा दारूण पराभव झाला. कॉंग्रेसला फक्त 1 जागेवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या 5 जागा जिंकता आल्या.
शिवसेना-भाजपाच्या महायुतीपुढे पराभव पत्करावा लागलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची मंगळवारी संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीतील पराभवाची समीक्षा करण्याबरोबरच महायुतीचा विजयाचा वारू रोखण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला. या बैठकीनंतर शरद पवार स्वत: आपल्या पक्षाच्या पराभवाचे कारणमिमांसा करण्याबरोबरच पराभवामागील कारणांचा शोध घेणार आहेत. त्यासाठी उद्या, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी 10 वाजता कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता पक्षाची जनरल बैठक होणार असून त्यामध्ये आमदार, खासदार आणि निवडणूक लढलेले नेते व कार्यकारिणीतील लोक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पवार स्वत: लोकसभा निवडूकीतील पराभव आणि आगामी विधानसभा निवडणूकीबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचेही राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.
मनसेच्या समावेशाबाबतही होणार चर्चा
लोकसभा निवडणूकीत स्वत:च्या पक्षाचा एकही उमेदवार उभा न करता भाजपाच्या पराभवासाठी राज्यात सभा घेणारे राज ठाकरे यांच्या मनसेचा आगामी विधानसभा निवडणूकीदरम्यान महाआघाडीत समावेश करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या चर्चेचा तपशिल समजला नसला तरी उद्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली.