Sharad Pawar – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागणार असून यामुळे राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे. अशातच काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याच्या हालचाली सुरु असल्याचे वक्तव्य करून संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे. राऊत यांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री शिंदे तीन दिवसांच्या सुट्ट्यांवर गेल्याचे वृत्त आल्याने या दाव्याला अधिकच बळ मिळाले आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, संजय राऊत यांच्या दाव्यावर भाष्य केले आहे. मंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.
संजय राऊतांच्या दाव्यावर शरद पवार म्हणतात…
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत चालू असल्याचा दावा केल्याबाबत विचारले असता शरद पवार यांनी, “मला काही माहिती नाही. मुख्यमंत्री बदलायचा निकाल आम्हाला सांगायचं कोणाला कारण नाही. असं काही आहे असं माझ्या कानावरही नाही. हे राऊतांचं स्टेटमेंट असलं तरी ते पत्रकार आहेत ते तुम्हा पत्रकार लोकांना अधिक माहिती असते.” असं उत्तर दिलं.
अजित पवार भावी मुख्यमंत्री?
दरम्यान, अजित पवार यांनी एका मुलाखतीमद्ये बोलताना राज्याचा मुख्यमंत्री व्हायला १०० टक्के आवडेल अशी रोखठोक भूमिका मांडली होती. यानंतर अजित पवार यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लावले आहेत. याबाबत विचारले असता शरद पवार यांनी, “भावी मुख्यमंत्र्याच्या पोस्टरवरून अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलं आहे की असा वेडेपणा करू नका.” असं एका वाक्यात उत्तर दिलं.
लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?
देशात पुढील वर्षी (२०२४) लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वीच राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे आडाखे बांधण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या चर्चा फोल ठरल्या आहेत. मात्र यानंतर भाजपने आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवला असून लवकरच काँग्रेसमधील एक गट भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.