औरंगाबाद – येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एका प्राध्यापकावर एका विद्यार्थिनीवर वर्षभराहून अधिक काळ बलात्कार केल्याप्रकरणी आणि तिच्या पालकांना त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कथित गुन्ह्यात प्राध्यापकाला पाठिंबा दिल्याबद्दल त्याच्या पत्नीच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पत्नीने पीडित मुलीला तिच्याकडून आपल्याला मुलगा हवा आहे अशी विचित्र मागणीही केली होती असे समोर आले आहे. या प्रकरणी मंगळवारी रात्री बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधीत पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 2019 ते 2021 दरम्यान या प्राध्यापकाने संबंधीत पीडितीचे ऑनलाइन क्लासेस घेतले. तिच्या प्रबंधाची तयारी करत असताना तो तिच्या संपर्कात आला आणि त्याने तिचा विश्वास प्राप्त करून तिला औरंगाबाद येथील त्याच्या घरी राहण्यास प्रवृत्त केले.
औरंगाबादमध्ये वास्तव्यादरम्यान, प्राध्यापकाने फेब्रुवारी 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. जेव्हा पीडितेने या प्राध्यापकाच्या पत्नीला कथित लैंगिक अत्याचारांबद्दल माहिती दिली तेव्हा तिने पीडितेला सांगितले की त्यांना तिच्यापासून मुलगा हवा आहे.
सदर पीडिता आजारी पडल्यानंतर आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील घरी परतली. तेव्हाही या प्राध्यापकाने फोनवरून तिला त्रास देण्यास सुरूवात केली. जेव्हा तिने त्याचे फोन घेणे बंद केले तेव्हा प्राध्यपकाने सदर मुलीच्या वडिलांना फोन करून धमकावण्यास सुरूवात केली. त्यानंतर मुलीच्या पालकांनी विद्यापीठाच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील समितीकडे या विषयी तक्रार केली.
त्यावेळी या प्राध्यापकाने सदर मुलीच्या घरी जाऊन तिला व पालकांना धमकावले. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या सुचनेनुसार तिने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या प्राध्यपकाच्या विरोधात आणि तिच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.