शामगाव ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

पंधरा कि.मी. अंतर पायी चालत ग्रामस्थांनी काढला मोर्चा ः अधिकाऱ्यांच्या लेखी आश्‍वासनानंतर मोर्चा विसर्जित

कराड -टेंभू योजनेतील पाणी शामगाव मधील शेतीसाठी मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी कराड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. गुरुवार, दि. 20 रोजी सकाळी 11 शामगाव येथून पायी चालत हा मोर्चा पंधरा किलोमीटरच्या अंतर पार करून कराडात दाखल झाला.

जिल्ह्यात अनेक धरणे असूनही शामगाव शेतीसाठी पाणी मिळाले नाही. गावच्या कित्येक पिढ्या पाण्यापासून वंचित राहिल्या आहेत. आता आम्ही थांबणार नाही. पाण्यावर आमचा हक्क असल्याने आम्ही शासनाकडून पाणी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी करत तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला. यावेळी टेंभूच्या कार्यकारी अभियंता घाडगे यांनी 20 जुलैपर्यंत प्रकल्पाचा आराखडा तयार करून वरिष्ठांकडे पाठवला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्याने मोर्चा विसर्जित झाला.

पाण्याच्या लढ्यासाठी शामगावकर गेली महिन्याभरापासून शासकीय अधिकाऱ्यांकडे याबाबत पाठपुरावा करीत आहेत. मात्र यावर काहीही ठोस उपाय न निघाल्याने अखेर त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. गुरुवारी सकाळी 11 वाजता ग्रामस्थांनी गाव बंद करून मोर्चाद्वारे कराडला येण्यासाठी पायी निघाले. हा मोर्चा शामगाव, वाघेरी, करवडी, ओगलेवाडी, कृष्णा कॅनॉल, कृष्णा नाका, पंढरीचा मारुती मार्गे कन्याशाळा तसेच पुढे मुख्य रस्त्यातून चावडी चौक मार्गे मोर्चेकरी प्रीतीसंगमावर गेले. तेथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळी जाऊन दर्शन घेतले.

शेतकऱ्याला न्याय द्या, आमच्या शेतीला पाणी द्या, पाणी आमच्या हक्काच, नाही कुणाच्या बापाच असे फलक मोर्चेकऱ्यांच्या हातामध्ये होते. सातारा जिल्ह्यात कोयना, कन्हेर, टेंभू यासारखे मोठे प्रकल्प आहेत. जिल्ह्यातील गावांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. याउलट हे पाणी सांगली जिल्ह्यात जात आहे. जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची गरज भागल्यानंतर अन्य जिल्ह्याला देण्यास आमची काही हरकत नाही. मात्र सध्या तसे होताना दिसत नाही. सातारा जिल्हा धरण क्षेत्र भाग असूनही बऱ्याच गावांना शेतीसाठी आवश्‍यक पाणी उपलब्ध होत नाही. याचा परिणाम स्वरूप शेतीमध्ये पिकेच घेता येत नाहीत.

त्यामुळे आधी जिल्ह्यातील पिण्याच्या व शेतीसाठी आवश्‍यक पाणी वापरात आणून उर्वरित पाणी बाहेर जिल्ह्यात द्यावे, असा सूर या ठिकाणी उमटला. शामगावचे एकूण क्षेत्र 1876 एवढे आहे. मात्र यापैकी फक्त 22 हेक्‍टरलाच टेंभू योजनेचा लाभ दिला गेला आहे.आणि संपूर्ण गावची फसवणूक करण्यात आली आहे. शेतीला पाणी नसल्यामुळे शेती पिकत नाही. त्यामुळे गावातील युवकांना काम धंद्यासाठी पुणे-मुंबई ठिकाणी जावे लागत आहे. या मोर्चाला भाजप कॉंग्रेस राष्ट्रवादी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी तहसीलदार अमर वाकडे, टेंभूचे अधिकारी यांच्यासमोर मोर्चेकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, सागर शिवदास, निवास थोरात, पंचायत समितीचे उपसभापती सुहास बोराटे, माजी पंचायत समिती सदस्य भीमराव डांगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन नलावडे, धैर्यशील कदम, सागर पाटील, शामगावच्या सरपंच शीतल गायकवाड, उपसरपंच रुपाली जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शामगावचे सर्व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.