तुकोबारायांच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड शहर सज्ज

पालखी सोहळा : संत तुकाराम महाराज पालखी आगमनानिमित्त तयारीला वेग

पिंपरी – तीर्थक्षेत्र देहू येथून पंढरीच्या विठुरायास भेटण्यासाठी निघणारी तुकोबारायांची पालखी पिंपरी-चिंचवड शहरात मुक्‍काम करते. देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर पालखी पिंपरी-चिंचवडमध्ये येते. संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी शहरामध्ये आवश्‍यक तयारीला वेग आला आहे. महापालिकेकडून आकुर्डीतील मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, 500 फिरते स्वच्छतागृह, वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था आदी सोय केली जाणार आहे. त्यासाठी पाण्याच्या टाक्‍यांची साफसफाई केली जात आहे. फिरत्या स्वच्छतागृहांची कोठे आवश्‍यकता आहे, याची पाहणी करून त्यानुसार त्याचे नियोजन केले जात आहे.

देहू येथुन संत तुकाराम महाराजांची पालखी सोमवारी (दि. 24) निघणार आहे. मंगळवारी पालखी शहरात दाखल होईल. निगडी येथील भक्‍ती-शक्‍ती उद्यान चौकात शहरवासियांकडून पालखीचे स्वागत करण्यात येईल. भक्‍ती-शक्‍ती उद्यान चौकात सध्या उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरचे काम सुरू आहे. चौकामध्ये खोदकाम केलेल्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे. आकुर्डी येथील रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे. आकुर्डी परिसरात विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिराजवळ असलेली अनधिकृत बांधकामे, टपऱ्या आदी नुकतेच हटविण्यात आले. वारकऱ्यांसाठी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये मोफत वैद्यकीय उपचारांची सोयही करण्यात आली आहे.

महापालिका आरोग्य विभागाकडून स्वच्छता

पालखी मार्गावर तसेच आकुर्डीतील विठ्ठल मंदिर परिसरात स्वच्छता, औषध फवारणी केली जात आहे. आकुर्डी परिसरातील वारकरी मुक्कामी थांबणाऱ्या शाळा, व्यापार संकुल आदींची साफसफाई सुरू आहे. निगडी, आकुर्डी, यमुनानगर, खराळवाडी, पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी अंतरात फिरत्या स्वच्छतागृहांची सोय केली जाणार आहे. त्यासाठी 500 फिरत्या स्वच्छतागृहांची मागणी केली आहे. पालखी पाठोपाठ आरोग्य कर्मचारी स्वच्छता करणार आहेत, अशी माहिती मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के.अनिल रॉय यांनी दिली.

विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिराला रंगरंगोटी

आकुर्डी येथील विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिराला रंगरंगोटी करण्यात येत आहे. मंडप व्यवस्थेचे काम सुरू आहे. परिसरातील शाळा, व्यापार संकुल आदी वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आवश्‍यक औषध फवारणी, साफसफाई केली जात आहे. सेंट ऊर्सुला शाळेजवळ उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचे काम अंतिम टप्प्यात आहे. संत तुकाराम महाराज व्यापार संकुलात वारकऱ्यांच्या मुक्‍कामाच्या ठिकाणी वीजपुरवठा, जनरेटर व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता आदींची सोय केली जात आहे. विठ्ठल मंदिर परिसरात सध्या सीसीटिव्ही कॅमेरे आहेत. मात्र, आवश्‍यकतेनुसार आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत, अशी माहिती नगरसेवक प्रमोद कुटे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.