मुंबई : मुंबई स्वच्छ ठेवणाऱ्या “स्वच्छता वॉरिअर्स’चे किंग खान शाहरुख खानने आभार मानले आहेत. त्याने मुंबईच्या स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी बृहन्मुंबई महापालिकेने बनवलेला एक व्हिडीओदेखील आपल्या ट्विटर हॅन्डलवर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये मुंबईच्या स्वच्छतेसाठी कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर सर्वसामान्यांनी केलेल्या स्वच्छता अभियानाची प्रसिद्धी करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये एका लहान मुलीने मुंबई शहरातील स्वच्छता अभियानाची माहिती सांगितली आहे. मुंबईत 46 हजार स्वच्छता वॉरिअर्स कार्यरत आहेत.
ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवायला या वॉरिअर्सनीच मुंबईकरांन शिकवले. येता जाता कचरा डस्टबीनमध्येच टाकण्याची सवय लावली. चौपाटी, बागांमधील कचरा योग्यठिकाणीच टाकला जायला लागला. यामुळेच मुंबईतले वातावरण निरोगी, स्वच्छ, निर्मळ आणि सुंदर होत आहे.
आपली मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी आपण केलेल्या कष्टांचे कौतुक करायला हवे, असे शाहरुखने म्हटले आहे. मुंबईसाठी काहीही करायची तयारी असलेल्या या “स्वच्छता वॉरिअर्स’सारख्यांमुळे मुंबईला शान आली आहे, असेही शाहरुखने म्हटले आहे. या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेल्या सर्व युवकांबरोबर त्यांच्या “ममा’ आणि “पापा’नाही शाहरुखने धन्यवाद दिले आहेत.