मुंबई- शाहरुख खानच्या नुकत्याच आलेल्या ‘पठाण’ या चित्रपटाने देशातच नव्हे तर परदेशात देखील धुमाकुळ घातला आहे. या चित्रपटातील ‘झुमे जो पठाण’ या गाण्याने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. परंतु याच पाठोपाठ शाहरुखच्या ‘डॉन 3’ या चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. पहिल्या दोन ‘डॉन’ आणि ‘डॉन 2’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.अशातच शाहरुख लवकरच मोठ्या पडद्यावर पुन्हा ‘डॉन’ ची भूमिका साकारताना दिसणार आहे. अशी आशा निर्माता रितेश सिधवानी यांनी व्यक्त केली आहे.
एका मुलाखतीत निर्माता रितेश सिधवानी यांनी खुलासा केला आहे की ‘डॉन 3’ अद्याप स्क्रिप्टिंगच्या टप्प्यावर आहे. यावेळी त्याने या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या कथेबद्दल काहीही माहिती नसल्याचेही सांगितले. रितेश म्हणतो, ‘जोपर्यंत माझा पार्टनर (फरहान अख्तर) लिहिणे पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करणार नाही. सध्या तो चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण करण्याच्या टप्प्यात आहे. आपण सर्वच जण ‘डॉन 3’ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत.
दरम्यान, किंग खान त्याचा ‘जवान’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. तसेच दक्षिणेचे दिग्दर्शक अॅटली दिग्दर्शित या चित्रपटात नयनतारा त्याच्यासोबत असणार आहे. तर साऊथ स्टार विजय सेतुपती या चित्रपटाचा खलनायक असणार आहे. त्याचबरोबर शाहरुख दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ चित्रपटातही काम करत आहे.