छायागीत 25 पैसे…

माझा जन्म आणि बालपण पूर्णपणे पेणमध्ये गेलं, अगदी बारावी शिक्षणापर्यंत. त्यामुळे आम्ही आमचं गाव कुठलं विचारले, तर पेणच सांगतो. तसे मूळचे महाडचे. चाळीतले वातावरण म्हणजे अगदी मनमोकळ्या स्वरूपाचं. कुणीही कुणाच्याही घरी बिनदिक्‍कतपणे कधीही जात असे. त्यावेळी कुणाच्या घरात रेडिओ असणं म्हणजे खूपच श्रीमंतीचं लक्षण होतं. हे साधारण सत्तर सालच्या आसपासची गोष्ट सांगत आहे. त्यावेळी मोठे जुने लाकडी कॅबिनेट असलेले रेडिओ असायचे. तेव्हा आम्हाला काही माहीत नव्हतं, पण ते व्हॉलचे रेडिओ असायचे. रेडिओ सुरू केला की थोडावेळ तापायला लागत असे आणि मग रेडिओवरील गोल बटणाच्या सहाय्याने स्टेशन सिलेक्‍ट केले जाई. आमच्या मागे एक भाभे म्हणून रिटायर सर होते, त्यांच्याकडे तसा रेडिओ होता. त्यावेळी आम्हाला काहीच जास्त समजत नसे. इंग्लंड वा ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर आपली क्रिकेट मॅच सुरू असली की, त्यांच्या घरी आम्ही मोठ्या मित्रांबरोबर जात असू.

इंग्लंडमध्ये मॅच असेल तर सायंकाळी वा ऑस्ट्रेलियाला असेल तर सकाळी त्यांच्या घरी आम्ही जमा होत असू. अतिशय कुतुहलाने तो रेडिओ ऐकला जाई. तसेच बिनाका गीतमाला ऐकण्यासाठी जात असू. श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन का विदेशी भाग है… अशी सुरुवात होत असे. विशेष म्हणजे तो रेडिओ किती बॅंडचा आहे त्याच्यावर त्याला लायसनही असे. साधारण दोन बॅंडचा रेडिओला वार्षिक पंधरा रुपये रेडिओ लायसन शुल्क म्हणून एक तिकीट पोस्टमध्ये मिळायचं आणि एक पासबुकही मिळे. त्या पासबुकावर ते तिकीट लावून त्यावर ते पोस्टाचा शिक्‍का मारून देत असत. दरवर्षी पंधरा रुपये असा खर्च असे. आता सर्वांना ऐकून खूप हसू येईल.

मग पेणमध्ये दूरचित्रवाणी म्हणजे टेलिव्हिजन आला. छोट्या पडद्यावर आम्ही चित्रपट पाहिलेले असत. घरात बसून आपण असे चित्रपट किंवा प्रत्यक्ष छायाचित्रण पाहू शकतो याचे आश्‍चर्य वाटे. आमच्या चाळीच्या मागे सुरेश शहा म्हणून एक व्यापारी राहात होते. त्यांच्याकडे एक मोठा टीव्ही आणला होता. आम्हास खूपच त्याचे अप्रूप वाटे. ते पैसे घेऊन आम्हाला टीव्ही पाहण्यास त्यांचेकडे बसू देत असत. त्यावेळी पूर्ण चित्रपट पन्नास पैशात ते दाखवत असत तसेच इतर कार्यक्रमही आम्ही कधी कधी आवडीने बघावयास जात अस्‌ू. “फूल खिले है गुलशन गुलशन’, “साप्ताहिकी’, “छायागीत’ हे कार्यक्रम ते प्रत्येकी 25 पैशात दाखवत असत. आता तुम्हाला ऐकून आश्‍चर्य वाटले असेल व हसूही आले असेल.

मग पुढे पुढे पेणमध्ये टीव्ही खूप वाढू लागले. आम्हा चाळकरी मित्रांच्या इतर श्रीमंत मित्रांकडेही टीव्ही आले. मग त्यांच्याकडे आम्हाला फुकट टीव्ही पाहायला मिळे. आमच्या किंवा माझ्या मोठ्या भावाच्या वर्गमित्राकडे असेल तर केव्हाही गेलो तरी काही प्रॉब्लेम नसे. त्यावेळी टीव्ही आणि रेडिओ ही दोनच मुख्य साधने होती. बरं रेडिओ आणि टीव्ही दोन्ही सरकारी म्हणजे इतर काही त्यात आता सारखे एफएम किंवा इतर सर्व खासगी चॅनल दूरदर्शनवर दाखवले जातात तसं काहीच नव्हतं.

आपल्या दूरदर्शन मराठीवर “आमची माती आमची माणसे’ हा कृषी विषयक कार्यक्रम व संध्याकाळच्या बातम्या लोक आवर्जून पाहात असत. चित्रपट फक्‍त रविवारी. त्यावेळी निवडणुका असल्या की त्यांची मतमोजणी व्हायला खूप वेळ लागे. कारण मतपत्रिकेद्वारा मतदान होत असे. मग पहिल्या सर्व मतपत्रिका मोजणी केंद्रावर येत असत त्यांचे शंभर शंभरचे गठ्ठे केले जायचे. वेगवेगळी टेबल मांडली जायची आणि मतमोजणीला सुरुवात होत असे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तर दोन दोन दिवस मतमोजणी चाले. अशा वेळी दूरदर्शनवर सतत वेगवेगळे चित्रपट दाखवले जात असत. आम्हा मुलांसाठी तर ती मेजवानीच वाटे. पुढे पुढे रेडिओमध्ये ट्रान्झिस्टर आले. ट्रान्झिस्टर नंतर रेकॉर्ड प्लेअर आले. तसेच दूरदर्शनमध्येही काळ्यापांढऱ्यावरून सप्तरंगी कलर टेलिव्हिजन आले. मध्यंतरी व्हिडिओ प्लेयर त्यात आले. आपल्याला हवा तो सिनेमा आपण पाहू शकतो याचे खूपच आश्‍चर्य वाटे.

अर्थात, तो जमानाच वेगळा होता. छोट्या छोट्या वस्तूंमध्येही आनंद होता. एकाच हॉलमध्ये आम्ही पंधरा वीस जणसुद्धा टीव्हीवरील कार्यक्रमाचा आस्वाद घेत असू. घरमालकांना किंवा टीव्हीच्या मालकासही त्याबाबत काही वाटत नसे. एकाच घरात दोन दोन तीन तीन टीव्ही आलेले आहेत. एकाच वेळी हॉलमध्ये घरातील तीन किंवा चार जण टीव्ही चालू असताना हातात मोबाइल घेऊन त्यामध्ये गर्क झालेल्या असतात. नक्‍की कोण काय पाहतंय हे कुणीच सांगू शकत नाही. असो शेवटी कालाय तस्मै नमः

मागोवा
उत्तम पिंगळे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.