वारजे – महापालिकेच्या कै. शामराव श्रीपती बराटे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे शिक्षक वाढवून द्यावेत, अन्यथा टाळे लावून आंदोलनाचा इशारा पालकांनी दिला होता. आंदोलनाला पालक मैदानावर हजर झाले आणि महापालिकेकडून सात शिक्षक वाढवून दिल्यामुळे आंदोलन स्थगीत केले.
विशेष म्हणजे आंदोलनाच्या दिवशीच सात शिक्षक रूजूही झाल्याने पालकांनी या शिक्षकांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. यापुढे शिक्षकांची संख्या कमी झाली तर कोणतीही पूर्वकल्पना न देता आंदोलन करू, असा इशारा पालकांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाला दिला आहे.
शाळा व्यवस्थापन समिती तसेच माजी नगरसेवक दिलीप बराटे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ व विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी शिक्षण प्रमुख, उपशिक्षण प्रमुख, उपायुक्तांबरोबर बैठक घेत शिक्षकांची मागणी केली होती. त्याला आज यश आले.
यावेळी शाळेबाहेर विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व माजी नगरसेवक दिलीप बराटे, माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी नगरसेवक सचिन दोडके, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ, माजी नगरसेवीका सायली वांजळे-शिंदे आदी उपस्थित होते.
“पालकांची एकजूट आणि पाठपुरावा यामुळे शाळेला शिक्षक मिळाले. मात्र, प्रशासनाचा एकही आधिकरी याठिकाणी नसल्याने, त्यांचा निषेध व्यक्त करतो.”- प्रदीप धुमाळ, माजी अध्यक्ष, शिक्षण मंडळ
“शैक्षणिक दर्जा टिकवणे शिक्षकांच्या हातात असते. शाळेत आवश्यक तेवढे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पालक व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याने शिक्षक मिळाले.” – सचिन दोडके, माजी नगरसेवक
“शाळेला शिक्षक वाढवून मिळावेत यासाठी टाळे लावू आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत शिक्षण विभागाने सात शिक्षक वाढवून दिल्याबद्दल अभिनंदन.” – दिलीप बराटे, माजी नगरसेवक